संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या दरम्यान, महाराष्ट्रातील गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

    गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. या दरम्यान, महाराष्ट्रातील गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. नक्षली कत्रांगट्टा गावाजवळ जंगलात तळ ठोकून काही तरी विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली सी-60 जवानांची दोन पथके रवाना करण्यात आली.

    परिसरात शोध मोहिम राबवली जात असताना अचानक नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पेरीमी दलमचा कमांडर डीव्हीसीएम वासूसह अन्य दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक (एसपी) नीलोत्पल यांनी सांगितले की, घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक कार्बाइन, एक इन्सास रायफल, नक्षलवादी साहित्य आणि इतर वस्तूही सापडल्या आहेत.

    मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक

    महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये पोलिसांकडून सध्या माओवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून पोलिस नक्षल्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत आहेत. छत्तीसगडमध्ये गेल्या चार महिन्यांत चकमकीत 90 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. 123 हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या काळात 250 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे.