नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा; आमदार कराड यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

लातूर जिल्‍हयात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वातील शिष्‍ठमंडळाने केली आहे.

    लातूर : लातूर जिल्‍हयात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वातील शिष्‍ठमंडळाने केली आहे.

    लातूर जिल्हयात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून खरीपाच्या पीकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र डोलाने आलेल्‍या पीकांवर गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्‍यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. गोगलगाय ही एक बहुभक्षी किड आहे पिकांचे रात्रीच्‍या वेळी सक्रीय राहून मोठया प्रमाणात नुकसान करते, या गोगलगायीमुळे सोयाबीनसह खरीपाच्यां इतरही पीकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

    गोगलगायीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी गोगलगायीने सोयाबीनसह इतर पीकेही नष्ट केली आहेत. त्या‍चबरोबर सततच्या पावसामूळे पीके पिवळी पडत असून पीकांची वाढ खुंटली आहे, गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि सततच्‍या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून सकंटात आलेल्‍या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची आर्थिक झळ सहन होणारी नाही. त्यामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पीकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे भेटलेल्‍या शिष्‍ठमंडळाने एका निवेदनाद्वारे केली आहे.

    दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली भेटलेल्‍या या शिष्‍ठमंडळात औसा विधानसभेचे आमदार अभिमन्‍यू पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्‍यक्ष विनायकराव पाटील, जिल्‍हा सरचिटणीस विक्रम शिंदे, प्रदेश पदाधिकारी अमोल पाटील यांच्‍यासह अनेकजण होते.