कामाची बातमी! अग्निशमन जवान भरतीसाठीच्या उंचीची मर्यादा सर्व महापालिकेत सारखी करा; बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या विभाग प्रमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

तरुणांमध्ये नेव्ही आर्मी पोलीस दलासह अग्निशमन दलाची क्रेझ आहे. त्यामुळे तरूण महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून देखील मुंबई अग्निशमन दलात अग्निशमन दलात पात्र ठरत नाही. राज्य शासनाच्या अग्निशमन सेवा संचालनालयाचे अग्निशामक पदासाठीचे नियम हे मुंबई अग्निशमन दलासाठी बंधनकारक असणे अत्यावश्यक आहे.

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) अग्निशमन दलामध्ये (Fire Brigade) अग्निशमक जवान (Firefighter) म्हणून किमान १७२ सेंटीमीटर (172 CM) उंची (Height) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र राज्याच्या अन्य महापालिकांमध्ये अग्निशमन दलामध्ये भरती होताना अग्निशमक जवानाची उंची १६५ सेंटीमीटर (165 CM) असावी अशी अट आहे. त्यामुळे अन्य पालिकांप्रमाणे उंचीची मर्यादा ठेवावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    देशभरात मुंबई अग्निशमन दल हे सर्वात मोठे आणि अत्याधुनिक अग्निशमन दल मानले जाते. मात्रअग्निशमन दलामध्ये अग्निशमन जवान व अधिकारी पदी भरती होण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत अग्निशमन सेवा संचालनालय मध्ये जवानांना ट्रेनिंग देण्यात येते. संचनालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी युवकांची १६५ सेंटीमीटर उंची असणे बंधनकारक आहे.

    सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी मुंबई अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी उदय तटकरे यांनी मुंबई अग्निशमन दलामध्ये भरती होणाऱ्या जवानांसाठी १७२ सेंटीमीटर उंचीची मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय शासकीय ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घेणाऱ्या जवानांसाठी अन्यायकारक आहे. असे नाईक यांनी म्हटले आहे.

    तरुणांमध्ये नेव्ही आर्मी पोलीस दलासह अग्निशमन दलाची क्रेझ आहे. त्यामुळे तरूण महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून देखील मुंबई अग्निशमन दलात अग्निशमन दलात पात्र ठरत नाही. राज्य शासनाच्या अग्निशमन सेवा संचालनालयाचे अग्निशामक पदासाठीचे नियम हे मुंबई अग्निशमन दलासाठी बंधनकारक असणे अत्यावश्यक आहे. परंतु नगर विकास खाते व राज्य अग्निशमन संचालनालय यांची कोणतीही परवानगी न घेता मुंबई अग्निशमन दलाने उंचीची अहर्ता किमान १६५ सेंटीमीटर वरून १७२ सेंटीमीटर केली आहे.

    त्यामुळे मुंबई अग्निशामक दलामध्ये होणाऱ्या ९०० जागांच्या भरतीसाठी अनेकजण वंचित राहू शकतात. यासाठी अग्निशमन दलाच्या या भरतीत उंचीची मर्यादा १६५  सेंटीमीटर ठेवावी. जेणेकरून राज्य शासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणांना मुंबई अग्निशमन दलामध्ये नोकरीची संधी मिळू शकेल, असे पत्र नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.