
राष्ट्रवादीमधील उभ्या फुटीनंतर पक्षाचे अनेक बडे नेते हे अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे आता ते कोणत्या गटात सामील होणार यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. पण आता त्यांनीच स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार एका गटासह भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. यावेळी शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेत आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते नवाब मलिक यांची काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटाक झाली. त्यामुळे ते नेमके कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न पडला होता, परंतु, त्यांनी एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करीत, आपण राष्ट्रवादीच्या मूळ पक्षासोबत असणार असल्याचे सांगितले.
मलिकांना नुकताच मिळाला जामीन
न्यायालयीन कोठडीत असताना नवाब मलिकांवर किडनीच्या आजारामुळं रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती ढासाळत असल्यानं वैद्यकीय कारणासाठी सुप्रीम कोर्टानं त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. जामिनानंतर तीन दिवसांनी मलिकांना मुंबईच्या सिटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या अनेक तास रुग्णालयाबाहेर उपस्थित होत्या.
दोन्ही गटांच्या नेत्यांनी केला मलिकांना संपर्क
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील स्वतः मलिक यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती. तर शरद पवारांसोबत असलेले अनिल देशमुख यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली होती.
प्रकृतीची विचारपूस
अजूनही ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. ते लवकर बरे होतील याची मला खात्री आहे, असं देशमुख म्हणाले होते. तसेच अजित पवारांनी देखील मलिकांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पण यावेळी आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. तसेच शरद पवारांनी देखील मलिकांची फोनवरुन विचारपूस केली होती.
मलिकांनी स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, प्रसिद्ध दैनिकाशी बोलताना मलिक म्हणाले की, मी कुठल्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादीसोबत असणार आहे. तसेच, मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी म्हटलं की, माझ्या वडिलांसाठी सर्वात प्राधान्याचे काम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत करणं असेल. त्यांना आम्ही उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवू तसेच त्यांना पुन्हा कामासाठी तयार करु.