फलटण येथील गर्भलिंग निदान प्रकरणातील ‘माळशिरस कनेक्शन’ उघड; दोन डॉक्टरांचा सहभाग असल्याचे समोर

फलटण येथील ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर, तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील 'माळशिरसचे कनेक्शन' समोर आले आहे.

    अकलुज / कृष्णा लावंड : फलटण येथील ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर, तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील ‘माळशिरसचे कनेक्शन’ समोर आले आहे. संबंधित एका डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्याला अटक करण्यासाठी वाई पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.

    फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे  स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते. त्यानंतर पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फौजदार विजय शिर्के यांनी तसेच त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये माळशिरसचे कनेक्शन समोर आले.

    फलटणच्या ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेने माळशिरस येथे जाऊन एका डॉक्टरांकडे गर्भपात केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर वाई पोलिसांचे एक पथक संबंधित डॉक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संबंधित डॉक्टर पसार झाले. तर दुसरीकडे फलटण येथील ऊसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टरही पसार झाले आहेत. हे डॉक्टरही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत, तेही फरार आहेत. पोलिसांनी अटक करू नये म्हणून माळशिरसमधील संबंधित डॉक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, या अर्जावर सोमवारी (दि. ५) सुनावणी होणार आहे.