
खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने मंगळवारी रात्री नेरपिंगळाई येथील एका शेतातून ताब्यात घेतले.
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने मंगळवारी रात्री नेरपिंगळाई येथील एका शेतातून ताब्यात घेतले. श्याम विठ्ठलराव तायवाडे (35, रा. नेरपिंगळाई, मोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल व सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे.
श्याम याने खासदार राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामध्ये त्याने नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्दांमध्ये धमकी देत शिवीगाळसुद्धा केली. अशा आशयाची तक्रार खासदार राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी सोमवारी राजापेठ ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पथक समांतर तपास करीत होते. त्यांनी मोबाइल त्यांना क्रमांकधारकाचा शोध सुरू केला. तपासात श्याम तायवाडे याचे नाव समोर आल्यावर त्याला त्याच्या नेरपिंगळाई गावातील एका शेतातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल व सीमकार्ड जप्त करण्यात आले.