sinnar crime

संपत तांबे याने संशयित प्रविण तांबे याच्या वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने बुधवार (दि. १) सायंकाळच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणाऱ्या रोडवर दुचाकीने संपतचा पाठलाग करीत अन्नपूर्णा हॉटेल जवळ एकटे गाठले. त्यानंतर आपल्याकडील धारदार तलवारीने संपत याचे मानेवर, पोटावर, हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली.

    पंचवटी: सिन्नर तालुक्यातील गोंदे येथील संशयिताने वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरुन गावातील एका तरुणाचा पाठलाग करत थेट तलवारीने भोकसून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) संशयिताचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. बुधवार (दि.१) नाशिक- पुणे महामार्गावर धोंडवीरनगर शिवारात संपत रामनाथ तांबे (३२) रा. गोंदे, ता. सिन्नर याला अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने अंगावर वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.

    अपहरणावरून वाद
    मृत संपत तांबे हा धोंडवीरनगर शिवार येथे आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचा इतिहास तपासला असता त्याच्यावर गेल्या वर्षी वावी पोलीस ठाण्यात चांगदेव तांबे (४५, रा. गोंदे, ता. सिन्नर) यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे चांगदेव यांचा मुलगा प्रविण तांबे (२२) आणि मृत संपत तांबे यांच्यात वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जुना वाद असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांचा संशय प्रवीणवर बळावला. अधिक तपास केला असता प्रवीण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे परिसरात असल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली.

    अशी घडली घटना
    संशयित प्रवीण तांबे याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. पुणे येथे गेलेल्या पोलीस पथकाने संशयित प्रविण याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने संपत तांबे याने संशयित प्रविण तांबे याच्या वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने बुधवार (दि. १) सायंकाळच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणाऱ्या रोडवर दुचाकीने संपतचा पाठलाग करीत अन्नपूर्णा हॉटेल जवळ एकटे गाठले. त्यानंतर आपल्याकडील धारदार तलवारीने संपत याचे मानेवर, पोटावर, हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली. या खुनाच्या गुन्ह्यात सिन्नर पोलिसांनी संशयित प्रवीण तांबे (२२, रा. गोंदे, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहेत.

    तपास पथकाला बक्षीस
    स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, हवालदार नवनाथ सानप, हेमंत किलबिले, प्रितम लोखंडे, विश्वनाथ काकड, सागर काकड, किरण काकड, प्रदिप बहिरम, भुषण रानडे आणि सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, चेतन मोरे, शहाजी शिंदे, पंकज देवकाते, समाधान बोराडे, कुष्णा कोकाटे, अंकुश दराडे, गौरव सानप आदीच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला असून पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.