salman khan

सलमान खानच्या ऑफिसच्या ईमेलवर मेल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला.वांद्रे पोलिसांचे पथक जोधपूरला रवाना झालं आणि त्यांनी आरोपीला अटक करून मुंबईत आणलं.

मुंबई: चित्रपट अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला राजस्थानमधील जोधपूरमधून अटक (Arrest) करण्यात आली आहे. सलमान खानच्या ऑफिसच्या ईमेलवर मेल करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत वांद्रे पोलिसांकडे 26 मार्च रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान ईमेलवरून धमकी देणारा आरोपी राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वांद्रे पोलिसांचे पथक जोधपूरला रवाना झालं आणि त्यांनी आरोपीला अटक करून मुंबईत आणलं. धाकडराम रामलाल सियाग असं अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय आरोपीचे नाव आहे. (Salman Khan Threatening)

वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप आणि त्यांच्या पथकाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्याची कारवाई केली. या मात्र आरोपीचा बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना अद्याप सापडलेले नाही. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. याआधीही आरोपीविरुद्ध पंजाबच्या पोलीस ठाण्यात धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील अटक आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सलमान खानला पुन्हा धमकी आल्यानंतर त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला. केवळ सलमान खानच नाही तर त्याच्या कुटुंबालाही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सलमान खानच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे पथक 24 तास त्याच्या घराबाहेर तैनात असतं.

या ईमेलवरून धमकी देण्याच्या प्रकाराआधी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर लॉरेन्स म्हणाला की, “सलमानने आमच्या समाजाला चांगली वागणूक दिलेली नाही. त्याने आमच्या भागात येऊन शिकार केली होती. त्यामुळे त्याने आता आमच्या समाजाची माफी मागायला हवी. पण सलमानला मिळालेल्या धमकीच्या पत्राचा आणि माझा काहीही संबंध नाही.” लॉरेन्स पुढे म्हणाला की, “सलमानने आमच्या समाजाची माफी मागितली तर ठीक नाहीतर आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. सलमानला मी धमकी देत नसून विनंती करत आहे. त्याने आमच्या समाजातील लोकांना पैसे देखील दिले आहेत. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत.”

बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई 28 वर्षांचा आहे, तर त्याच्या टोळीतील सदस्य वीस ते पंचवीस या वयोगटातील आहेत. मात्र, या वयात या सर्वांवर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे नोंद आहेत.