माणदेशी शिक्षकाचा राळेगणसिद्धीत राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान

सतेश कुमार माळवे यांना राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या वतीने राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथील आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    वडूज : राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणविषयक व साहित्यिक या क्षेत्रामध्ये जवळपास २५ वर्षांचा प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कामगिरी करत असलेले पळशी (ता.माण) येथील सुपुत्र व आदर्श शाळा लोधवडे येथील शिक्षक सतेश कुमार माळवे यांना राष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या वतीने राळेगणसिद्धी (ता.पारनेर) येथील आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे, सचिव दीपक काळे, माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    सतेश कुमार माळवे हे शैक्षणिक क्षेत्रात पूर्णपणे झोकून काम करीत असून, आजवर त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. त्यांच्याकडे शिकलेल्या विदयार्थ्यांनी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. माळवे यांनी नोकरीच्या सुरुवात काळात अगदी मंदिरात भरणाऱ्या शून्यातील शाळेचे रुपडे बदलून तिला भव्य अशा ज्ञानमंदिरात रूपांतरित करण्यापासून ते सुट्टीदिवशी शाळेचं बांधकाम, पाणी मारणे, वाळू चाळणे आदी कामं केली आहेत.

    विद्यार्थी घडवताना केवळ प्रामाणिक शिक्षण देणे हा मुख्य उद्देश ठेवून ते आजवर ज्ञानदानाचे काम करत आहेत. शिक्षण विभागाने ही त्यांच्या चांगल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विविध प्रकारच्या शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित केले आहे.