
लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी बीएमसीचे 50 लाखांपर्यंतचे बजेट आहे. येत्या 6 महिन्यात या स्मारकाचे काम पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकाला ‘सुरांचा कल्पवृक्ष’ असे नाव देण्यात येणार आहे.
मुंबई: लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकाचं आज लता दीदींच्या पहिल्या पुण्यतिथीला भूमिपूजन करण्यात आलं. हे स्मारक मुंबईमधील हाजी अली चौकामध्ये उभारण्यात येणार आहे. यावेळी स्मारकाच्या भूमिपूजनाला उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली.
स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उषा मंगेशकर म्हणाल्या की, “लता दीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, याचा खूप आनंद होत आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे, अशी आमची राज्य सरकारला विनंती आहे.”
लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबई महापालिकेकडून मुंबईमधील ताडदेव येथील हाजीअली चौकात बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, नेफू आदिनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्यांनी हजेरी लावली. तसेच शिवाजी साटम, सुदेश भोसले आणि नितीन मुकेश अशा चित्रपट कलाकारांनीही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
लता मंगेशकर यांच्या स्मारकासाठी बीएमसीचे 50 लाखांपर्यंतचे बजेट आहे. येत्या 6 महिन्यात या स्मारकाचे काम पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे. लता मंगेशकर यांच्या स्मारकाला ‘सुरांचा कल्पवृक्ष’ असे नाव देण्यात येणार असून, त्यासोबतच आकाश आणि धरती या नावानेही ते ओळखले जाणार आहे. महत्त्वाच्या दिवशी या स्मारकामध्ये स्पीकरवर लता मंगेशकर यांची गाणीही लावली जाणार आहेत.
दरम्यान मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक ट्वीट शेअर करुन लता मंगेशकर यांना अभिवादन केलं आहे.राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्यांना सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत, राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !”