अक्षय तृतीयेमुळे आंब्याला भाव, मोठ्या प्रमाणावर विक्री; हापूससह ‘या’ आंब्याला मागणी

अक्षय तृतीयेमुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तयार आंब्याला मागणी जास्त असल्याने भावातही वाढ दिसून आली. पुढील काळात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक तुलनेत कमी होत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याची मागणी पुढील काळात वाढू शकते.

  पुणे : अक्षय तृतीयेमुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आंब्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तयार आंब्याला मागणी जास्त असल्याने भावातही वाढ दिसून आली. पुढील काळात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक तुलनेत कमी होत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याची मागणी पुढील काळात वाढू शकते.
  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयाच्या दिवशी आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे यादिवसाकरीता आंब्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या संदर्भात मार्केट यार्ड येथील आडतदार करण जाधव म्हणाले, की देवगड भागातील आंब्याचा हंगाम जवळजवळ संपलाच आहे. आता रत्नागिरी हापूस आंब्याची आवक देखील पुढील काळात कमी होत जाणार आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात कच्च्या मालाची खरेदी किरकोळ विक्रेत्यांकडून झाली होती.
  तसेच बाजारातील व्यापाऱ्यांनी देखील आंबा तयार करण्यासाठी ठेवला होता. हा तयार झालेला आंबा गुरुवारी बाजारात मोठ्या प्रमाणावर विकला गेला. चांगल्या प्रतीच्या आंब्याला प्रति डझनाला साधारणपणे ५०० ते ९०० रुपयापर्यंत भाव मिळाला. ग्राहकांनी आंबा खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती .एकीकडे तयार आंब्याला मागणी वाढली असतानाच पुढील काळात कच्चा माल कमी येणार असल्याने त्याला देखील मागणी खरेदीदारांकडून होती, असेही त्यांनी सांगितले.
  बाजारात तुलनेत रत्नागिरी हापूसची आवक कमी झाली आहे, यासंदर्भात आडतदार युवराज काची म्हणाले, की यावर्षी आंब्याचा हंगाम हा एक महिना आधीच सुरू झाला. त्यामुळे सध्या कच्च्या आंब्याची आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होत आहे. यामुळे बाजारात तयार आणि कच्चा आंबा मागणीच्या तुलनेत पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाला नाही. तयार मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. साधारणपणे प्रति डझनाला प्रतिनुसार ४०० ते ७०० रुपये इतका भाव मिळाला.
  ग्राहकांकडून कोकणातील हापूस आंब्याला मागणी असते, परंतु  त्याची आवक कमी होते. तसेच त्यांचे भाव ही सर्व सामान्य ग्राहकांना परवडणारे नसतात. मागणी आणि तुलनेत कमी दर असल्याने  कर्नाटक हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर विकला जातो. कोकण हापूस प्रमाणेच कर्नाटक हापूस आंबा खाणारा मोठा ग्राहक वर्ग आहे. या आंब्याविषयी आडतदार रोहन उरसळ म्हणाले, की तयार आंब्याला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. तयार आंबा शिल्लक राहीला नाही.  कर्नाटक हापूस आंब्याच्या चार डझन पेटीला ८०० ते १२०० रुपये इतका भाव मिळाला. तर कच्च्या आंब्याच्या पेटीला ८०० ते १४०० रुपये भाव मिळाला. कोकण भागातील आंब्याची आवक कमी होत चालली आहे. यामुळे पुढील काळात कर्नाटक हापूस आंब्याची मागणी देखील वाढत जाणार आहे.
  इतर आंब्याचे भाव
  पायरी : ८०० ते १२०० रुपये
  लालबाग : २५ ते ४५ रुपये
  बेंगनपेल्ली : ३० ते ५० रुपये
  ताेतापुरी : २० ते ४० रुपये
  केशर : ६० ते ९० रुपये