‘मनमंदिरा’ सांगितिक मैफिलीने रसिकांना केले मंत्रमुग्ध

कृष्णा हॉस्पिटलचा मानसोपचार विभाग आणि पुणे येथील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मनमंदिरा’ या सांगितिक मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

    कराड : कृष्णा हॉस्पिटलचा मानसोपचार विभाग आणि पुणे येथील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मनमंदिरा’ या सांगितिक मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मानसिक आजाराबाबत समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने स्किझोफ्रेनिया जनजागृती सप्ताहाअंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमात गायक संदीप उबाळे, गायिका स्वरदा गोडबोले यांनी ‘गगन सदन’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘बेहता है मन कही’, ‘आधार कसा शोधावा’, ‘गुंजा सा है कोई इकतारा’, ‘तोरा मन दर्पण कहलाये’, ‘आनेवाला पल जानेवाला है’, ‘रुक जाना नही तू कही हार के’, ‘कुछ तो लोक कहेंगे’, ‘मन अधीर झाले’, ‘मितवा’ अशी मनाच्या भावना व्यक्त करणारी गाणी सादर केली. ‘मनमंदिरा तेजाने’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

    निवेदिका विनया देसाई यांनी बहिणाबाई चौधरी यांची कविता ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर’, गुरू ठाकूरची ‘अस जगावं जगामध्ये’ या कवितांचा दाखला देत, स्किझोफ्रेनिया हा गंभीर आजार असला तरीही त्याला समजून घेऊन इतरांची मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मनाची गुंतागुंत सोडवण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे. या आजाराची माहिती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. जनजागृती झाली पाहिजे. वादक अभिजित भदे, विशाल गंड्रतवार, अमृता ठाकूर देसाई, दर्शना जोग, सचिन शेवडे यांनी संगीत साथ दिली.

    याप्रसंगी स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनच्या सचिव नीता कोपरकर, समुपदेशक कादंबरी कुलकर्णी, समीर लेले आदींसह मान्यवर उपस्थित होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अजिश मंगोत यांनी स्वागत केले. डॉ. वसंतमेघना मूर्ती यांनी प्रस्ताविक केले. मनोसामाजिक कार्यकता वैशाली यादव यांनी सूत्रसंचालन केले. समुपदेशक शुभांगी जमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सिद्धांत महापात्रा, डॉ. भावना शर्मा, गणेश घोडके, शैलजा पाटील आदींचे सहकार्य लाभले.