मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी नवी मुंबईतच मुक्काम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झालं. या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

    आमच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मी राज्य सरकारचे आभार मानतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. “आमची विजयी सभा अंतरवाली सराटी येथील सभेपेक्षाही प्रचंड मोठी असेल. या सभेत आमचा सर्व मराठा समाज एकत्र जमणार आहे”.

    “आम्हाला फक्त ठिकाण बघायचं आहे. आम्ही शनिवारी (२७ जानेवारी) वाशी येथील शिवाजी चौकात जल्लोष करणार आणि त्यानंतर विजयी सभेची तारीख जाहीर करणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

    एकनाथ शिंदेंनी आमचं आरक्षणचं काम केलंय : मनोज जरांगे 

    “वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं आरक्षणचं काम केलं आहे.”, असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.