मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंना मिळतोय पाठिंबा; आमदार-खासदारच बसले उपोषणाला

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे. आता वेळ काढून चालणार नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची काळजी घेतली पाहिजे.

    सांगली : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे. आता वेळ काढून चालणार नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा आणि गतिमान पद्धतीने आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणी जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी आज राज्य आणि केंद्र सरकारकडे केली.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नेत्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले. खासदार संजय पाटील, आमदार विश्‍वजीत कदम, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, सुमन पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड यांनी पत्र पाठवले. त्यांच्यासोबतच माजी आमदार सदाशिवराव पाटील, नितीन शिंदे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार यांच्यासह विविध पक्षातील लोक सहभागी झाले.

    मराठा समाजातील मान्यवरांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात नेत्यांना खिंडीत गाठले होते. मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या, अशी मागणी केली होती. त्यावर नेत्यांनी लाक्षणिक उपोषण करू आणि एक दिवसाच्या अधिवेशनाची मागणी करू, असे सांगितले होते. त्यानुसार आज नेत्यांनी हजेरी लावली. ‘मी मराठा’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून ते सहभागी झाले. संजय पाटील, विश्‍वजीत कदम यांनी भगवे उपरणे घेतले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, अशा घोषणा देण्यात आल्या. मिनाक्षी माने, प्रा. राणी यादव, सिंधूताई गावडे, नलिनी पवार, शुभांगी साळुंखे, आशा पवार आदी महिला सहभागी झाल्या.

    मराठा आरक्षणाची मागणी योग्य

    खासदार संजय पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य असून, ती तात्काळ मान्य झाली पाहिजे. यासाठी आम्ही नेहमीच समाजाच्या पाठीशी उभे आहोत. सरकारने आता घाई करण्याची गरज आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती महत्वाची आहे. इतरांच्या आरक्षणाचा प्रश्‍नही चर्चेत आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, यासाठी आम्ही आग्रही राहू.’