
मनोज जरांगे यांची अवस्था बघून या आरोग्य सेविकेला देखील अश्रू अनावर झाले आहेत. रेखा पाटील असे या आरोग्य सेविकेचे नाव आहे. आरोग्य सेविका रेखा पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांनी उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली.
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यांना बोलताना देखील त्रास होत आहे. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी नांदेड येथून एक आरोग्य सेविका आल्या आहेत. मनोज जरांगे यांची अवस्था बघून या आरोग्य सेविकेला देखील अश्रू अनावर झाले आहेत.
रेखा पाटील असे या आरोग्य सेविकेचे नाव आहे. आरोग्य सेविका रेखा पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांनी उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली. जरांगे यांची तब्येत पाहून आरोग्य सेविका रेखा पाटील ढसा ढसा रडल्या. सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि जरांगे यांचा जीव वाचवावा अन्यथा आम्ही तलवारी घेऊन तुमच्या घरात घुसू असा इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.
हृदय बंद पडलं तर…
आता त्यांची जगण्याची लिमिट संपली आहे. मी स्वतः आरोग्यसेविका आहे. माझ्या भावावर उपचार करा. आज आम्हाला आरक्षण महत्त्वाचं नाही माझा भाऊ महत्त्वाचा आहे. माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर मी स्वतः तलवार घेऊन येईल, असा इशारा आरोग्य सेविका रेखा पाटील यांनी दिला आहे.
जरांगेंना वैद्यकीय मदतीची गरज
‘आरक्षण मिळणारच आहे. मात्र आता मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. आपण बघ्याची भूमिका घेणे अत्यंत मुर्खपणा ठरु शकतो. आपण त्यांचा जीव घ्यायचा का? त्यानंतर आरक्षण घेऊन करायचं काय? माझा भाऊ आरक्षण पाहायला जिवंत राहिला पाहिजे. तो तडफडून मरत आहेत, हे बघत राहायचं का?’ असा सवालही रेखा पाटील यांनी विचारला.
आम्ही पाकिस्तानी आहोत का?
“सरकार मनोज जरांगे यांचा जीवच घ्यायचा आहे. सरकारने 40 दिवस काय केले. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?,” असेही रेखा पाटील म्हणाल्या.