मनोज जरांगे पाटलांची आज जंगी सभा, आंतरवाली सराटीत रात्रीपासूनच कार्यकर्ते, लोकांची गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आज (14 ऑक्टोबर) रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेने कूच केली आहे.

  जालना : सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा घेतल्या. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद देखील भेटत आहे. दरम्यान आज (14 ऑक्टोबर) रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची जंगी सभा होणार आहे.

  या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी जालन्याच्या दिशेने कूच केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे ४० दिवसांचा वेळ मागवून घेतला होता. या काळात आपण आरक्षणचा मुद्दा मार्गी लावू असं आश्वासन देखील राज्य सरकारने दिलं होतं. या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता, वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

  राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. येत्या ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास पुन्हा एकदा आपण बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता जरांगे यांनी सरकारला दिलेला ४० दिवसांचा अवधी आज संपला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आजच्या सभेत काय बोलणार? आरक्षणाबाबत मराठा समाजाची काय भूमिका मांडणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

  सभेसाठी १६० एकरावर मंडप

  आंतरवाली सराटी गावात होणाऱ्या या सभेसाठी १६० एकरावर मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाला ‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ असे नाव देण्यात आले आहे. सभामंडपातील शेवटच्या मराठा बांधवाला व्यवस्थित भाषण ऐकू यावे, तसेच दिसावं यासाठी मोठमोठ्या स्क्रीनची सोय करण्यात आली आहे.

  जालन्यात आज शाळा बंद

  जालन्यातील अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्रप्रमुख तथा मुख्यध्यापकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.