मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या मैदानात! ‘या’ तारखेपासून देणार सगेसोयरे शब्दासाठी लढा

आरक्षणातील सगेसोयरे शब्दासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

    जालना : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यामध्ये देखील जोरदार प्रचार सुरु आहे. राज्याचे राजकारण सध्या निवडणूकीकडे वळालेले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उगारलेले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करणाऱ्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. आरक्षणातील सगेसोयरे शब्दासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर राजकारणात येणार असल्याचे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    येत्या 4 जून रोजी देशातील सत्तेचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 जूनपासून ते उपोषणावर बसणार आहेत. अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु होणार आहे. सगेसोयरे शब्द आणि मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषण सुरु करणार आहे. त्याचबरोबर 8 जून रोजी जरांगे पाटील यांची नारायण गडावर सभा देखील पार पडणार आहे.

    आपले उपोषण जाहीर करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मोदी महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा घेत नव्हते. पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हाय जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या आहेत. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रामध्ये होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या 4-5 माणसांमुळे आली. आम्ही भाजपविरोधी नाही. सगेसोयरे आणि ओबीसी व मराठा एकच असल्याचा दर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढणार. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणामध्ये येणार नाही,” असे देखील मनो जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.