मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर! राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या आहेत.

    जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आता पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. राज्य सरकारने (State Govt) अधिसूचना काढत सगेसोयरे शब्दांसह सुवर्णमध्य काढला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यावेळी आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारने दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या स्पष्ट केल्या आहेत.

    जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत उपोषणाला बसले आहेत. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “उपोषण मागे घेताना सरकारचा गुन्हे मागे घेण्याचा शब्द होता. मात्र आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही,” अशी तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच “राज्य सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवावे. विशेष अधिवेशन बोलवा व कायदा पारित करा. मराठा आरक्षणासाठीच्या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा. सग्या सोयरांचा कायदा पारित करा” अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. “ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तोपर्यंत उपचार घेणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचे तर कायदा का लागू करत नाही ?” असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे.

    मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली येथे उपोषणाला बसल्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात मुंबईत येण्यापूर्वी राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र यावेळी सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे देखील ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘भुजबळ यांना कोणीच धमकी देऊ शकत नाही’ असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.