मराठा आंदोलकांची निराशा! मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील सभा रद्द, नेमकं कारण काय?

मराठा आंदोलकांची निराशा करणारी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील सभा रद्द करण्यात आली आहे.

    जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या 4 जूनपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. मात्र मराठा आंदोलकांची निराशा करणारी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील सभा रद्द करण्यात आली आहे.

    येत्या 8 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा होणार होती. तब्बल 400 एकरावर होणाऱ्या सभेला लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार होते. विराट स्वरुपाची ही सभा असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये देखील उत्साह होता. जरांगे पाटील यांच्या या बीडमधील सभेची सर्वत्र चर्चा रंगली होती. राज्य सरकारला धडकी भरवणारी ही सभा असेल असे आंदोलकांकडून सांगण्यात येत होते.  मात्र आंदोलकांचा हिरमोड झाला आहे. बीडमधील आयोजित सभा रद्द करण्यात आली आहे.

    बीडमधील विराट सभा रद्द करण्यामागे पाण्याचा भीषण प्रश्न असे कारण आहे. सध्या राज्यातील उन्हाळा कडक झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये भीषण पाणी टंचाई असल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द झाली आहे. बीडवर दुष्काळचे सावट असताना उपस्थित लोकांची पाण्यामुळे गैरसोय होण्याची मोठी शक्यता होती. लोकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली असती. यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आली आहे. जून महिन्यानंतर मराठा समाजाची ही सभा आयोजित केली जाणार आहे.