मराठा समाजाच्या संयमाची वाट पाहू नका, अन्यथा…; बीडच्या सभेपूर्वी मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेतून मनोज जरांगे 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. या सभेपूर्वी जरांगे यांनी बीड शहरात जाहीर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.

  बीड : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेतून मनोज जरांगे 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सभेपूर्वी जरांगे यांनी बीड शहरात जाहीर पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
  ‘आमच्या संयमाची वाट पाहू नका’
  सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम असून आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार, आमच्या संयमाची वाट पाहू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.
  महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत. उपोषण सुरू असताना राज्य सरकारने मला काही शब्द दिले होते. बाकी सर्व माहिती आजच्या सभेत सांगणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे.
  मराठा समाजाला किती येड्यात काढणार ?
  सरकारने मागितलेला वेळोवेळी आम्ही वाढवून दिला आहे. तरी सुद्धा मागील दोन महिन्यात सरकारने काहीच केलं नाही. आम्ही सरकारला सांगितले की अभ्यासक वाढवा. त्यावेळी सरकार छगन भुजबळ यांचं ऐकत होते. लोकांना उचलून आतमध्ये टाकले जात होते. तुम्ही मराठा समाजाला किती येड्यात काढणार आहात, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे.