मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे आता ‘या’ समाजासाठीही करणार प्रयत्न

मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही हाती घेणार असल्याचे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सांगितले.

    गेवराई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागल्यानंतर मी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही हाती घेणार असल्याचे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी गेवराईचे ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

    काझी अमान म्हणाले की, मराठा समाज हा मोठा भाऊ असून, मुस्लिम समाज हा छोटा भाऊ आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मुस्लिम समाज आपल्या मोठ्या भावासोबत खंबीरपणे उभा आहे. मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटलांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी लगेच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागताच मी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हाती घेईन, अशी ग्वाही दिली.

    यावेळी गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी नगरसेवक मंजूर बागवान, फेरोज अहेमद, भद्रीभाऊ तारक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व गेवराईचे पत्रकार बांधव उपस्थित होते.