खराडीत मनोज जरांगेंची तोफ आज धडाडणार; सभेसाठी वाहतुकीत झालाय ‘असा’ बदल

पुण्यात सकल मराठा समाजाकडून आज (दि २०) खराडीतील महालक्ष्मी लॉन येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या सभेला होणारी गर्दी विचारात घेऊन नगर रस्त्यावरील वाहतुकीत सोमवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे.

    पुणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांची पुणे शहरातील खराडीत सभा होत आहे. तसेच संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात ही सभा होणार आहे.

    पुण्यात सकल मराठा समाजाकडून आज (दि २०) खराडीतील महालक्ष्मी लॉन येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या सभेला होणारी गर्दी विचारात घेऊन नगर रस्त्यावरील वाहतुकीत सोमवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. या बदलाची दखल घेऊन प्रवास करावा, असे आवाहंन पुणे वाहतुक पोलिसांनी केले आहे.

    पुण्यात आज नगर मार्गावर होणारी गर्दी पाहता येथील वाहतूक ही बदलण्यात आली आहे. नगर रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण, भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे जातील. तर नगर रस्त्यावरून हडपसर, सासवड आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केसनंदमार्गे थेऊर फाटा येथून इच्छितस्थळी जावे लागणार आहे.

    सोलापूर रस्त्याने नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी थेऊर येथून इच्छितस्थळी जावे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांनी भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे. वाघोली येथून पुण्याकडे येणाऱी वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.