
मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून ज्यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला आहे. त्या मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी 2 जानेवारी मुदत दिली असताना आजपासून महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ केला आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून पेटलेले मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावरून राज्यात झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यास तसेच ते शोधण्यासाठी जोरदारपणे कामाची सुरुवात केली आहे. असे असताना मनोज जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले तसेच आरक्षण देण्यासाठी सरकारला 2 जानेवारीची मुदत दिली आहे. तरीही आता मनोज जरांगे यांनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे.
गेल्या रविवारपासून महाराष्ट्रात एक प्रचंड मोठी अस्थिरता आणि अस्वस्थपणा भरलेला दिसतो आहे. त्या रात्री मराठा आरक्षणाने हिंसक वळण घेतले आणि बीडमध्ये आमदारांची घरे पेटली. पाठोपाठ कोल्हापुरात, अमरावतीत, नागपुरात, सोलापुरात, पुण्यात… ठिकठिकाणी दररोज काही ना काही हिंसक घटना घडताना दिसू लागल्या. वृत्तवाहिन्यांच्या पडद्यांवर तोडफोडीची आणि जाळपोळीची दृष्ये नित्यशः दिसू लागल्यामुळे अस्वस्थेत भरच पडत राहिली. मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा जे उपोषण सुरु केले ते पूर्ण तयारीनिशी केले आहे. त्यांच्या मागे एक तरुणांचे राज्यव्यापी संघटन उभे ठाकले आहे आणि हा तरूण आरक्षणासाठी पेटून उठला आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाला न जुमानणारा आहे. त्याला जरांगे पाटील हाच एकमेव आधार वाटू लागला आहे आणि म्हणूनच सर्वच पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी आमदार- खासदार हे घाबरलेल्या स्थितीत गेले आहेत.
ऑगस्ट अखेरीकडे जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात जे आंदोलन सुरु केले, त्याचे सुरुवातीचे रूप अगदीच लहान होते. त्यांच्यासोबत थोडे तरूण बसले होते. शे-दोनशे लोक तिथे येत जात होते. चौथ्या- पाचव्या दिवशी त्यांचे उपोषण आंदोलन कदाचित संपूनही गेले असते. गेल्या दशकभरात त्यांनी अकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणे केली आहेत. आरक्षणाच्या विविध आंदोलनात त्यांनी स्थानिक स्तरावर सहभागही घेतला आहे. पण त्यांच्या नेतृत्वाने जिल्ह्याच्या सीमा त्या कळता ओलांडल्या नव्हत्या. जालन्याच्या पोलिसांनी त्यांना अटक करून जिल्हा रुग्णालयात भरती करण्याचा, उपोषण जबरीने तोडण्याचा जो नस्ता उद्योग १ व २ सप्टेंबरच्या रात्री केला; तोच जरांगेंच्या राज्यव्यापी नेतृत्वाचा जन्मक्षण ठरला, असे सहजच म्हणता येईल.
त्या रात्री आंतरवाली सराटी गावात काही डोकी फुटली, काही दगड फेकले गेले, पोलिसांनी लाठ्या चालवल्या, छऱ्याच्या बंदुकाही चालवल्या. त्या साऱ्या घटनांचे व्हीडिओ रातोरात राज्यात सर्वत्र पसरले. अचानक जरांगेंच्या आंदोलनाला फार मोठे पाठबळ लाभले. पोलीस कारवाईमुळे जरांगेंचे उपोषण संपले तर नाहीच, उलट आरक्षणाच्या मागणीने प्रचंड पेट गेतला. गेली तीस वर्षे मराठा समाजाने हरतऱ्हांनी आरक्षणाचा आग्रह धरला. मूकमोर्चांचे प्रचंड वादळ ठले. विनायक मेटेंसारखे असंख्य नेते विविध मार्गांनी प्रश्नाचा आग्रह धरत राहिले. उपोषणेही झाली. पण सप्टेंबरच्या सुरवातीला आंदोलनाने जी उसळी घेतली ती अभूतपूर्व होती.