मनोज जरांगेंच्या ‘महासंवाद’ला पोलिसांनी नाकारली परवानगी; आयोजकांनाही बजावली नोटीस

सकल मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचे आयोजन केले जात आहे. येत्या 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे अशाच महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

    बीड : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सरकार विरुद्धचा लढा सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचे आयोजन केले जात आहे. येत्या 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे अशाच महासंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारत आयोजकांना पोलिसांनी कलम 149 सीआरपीसी प्रमाणे नोटीसही बजावली आहे. मात्र आयोजकांकडून ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कसल्याही प्रकारच्या जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे व मेळाव्यांचा आयोजनावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याच आदेशाचा दाखला देत पोलीस प्रशासनाने महासंवाद बैठकीला परवानगी नाकारली आहे. ही बैठक मोंढा मार्केट, हनुमान मंदिरासमोरील मैदानात होणार असून, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची रीतसर परवानगी घेण्यात आली होती, या परवानगीच्या आधारे आयोजकांनी परळी शहर पोलीस ठाण्यात 13 मार्च रोजी महासंवाद बैठकीसाठी अर्ज केला होता.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार आयोजकांनी जातीचा उल्लेख टाळत पुन्हा काल (दि.17) रोजी परळी पोलीस प्रशासनाला नवीन अर्ज देत या बैठकीसाठी परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश व लोकसभेची आचारसंहिता याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या महासंवाद बैठकीला अद्याप परवानगी दिली नसल्याची माहिती समजली आहे. मात्र ही महासंवाद बैठक घेण्यासाठी ठाम असल्याचे दिसून येत आहे.