मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उभं राहाताना कोसळले, तरीही मागणीवर ठाम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यानी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय.

    जलना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यानी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय, उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. बोलायला उभं राहाताना ते कोसळले. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण उपोषणावर ठामच आहेत. तसंच उपचार घेण्यासाठीही त्यांनी नकार दिलाय.

    पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

    राज्यात आरक्षण मागणीवरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मराठवाड्यात बीड लातूर जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले आहे. पुणे शिवाजीनगर बसस्थानकावरुन मराठवाड्यातील अनेक भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारपासून बीड, लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस सेवा रद्द केली आहे. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अनेक नागरिकांना आपला प्रवास रद्द करावा लागला.

    आमदाराचे घर पेटवले

    राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, गाड्या अडवणे असे प्रकार सुरु आहेत. त्यातच आज मराठा आंदोलकांनी बीडमध्ये थेट आमदाराचं घर पेटवलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराजवळ पार्किंग लॉटमधील गाड्यांना मराठा आंदोलकांकडून आग लावण्यात आली. पसरलेल्या आगीमुळे घराचाही काही भाग जळाला आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.