
पोलिसांनी सुरेंद्र पाटील याला वर्षभराकरीता ठाणे जिल्ह्यातून तडीपार केलं आहे.
कल्याण: प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा खरंच काही नेम नाही. डोंबिवलीतील रील स्टारने तर कहरच केला. सुरेंद्र पाटीलने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये (Manpada Police Station) पोलिसांच्या खुर्चीवर बसून रिल तयार केलं. ही घटना नोव्हेंबर 2022 मध्ये घडली होती. त्यानंतर या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत सुरेंद्र पाटील (Surendra Patil) याला अटक करण्यात आली होती. दरम्यान या आधी देखील सुरेंद्र पाटील विरोधात मारहाण, फसवणूक यासारखे एकूण सात गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरेंद्र पाटील याला वर्षभराकरीता ठाणे जिल्ह्यातून तडीपार केलं आहे. पोलिसांकडून डोंबिवलीतील (Dombivali) बांधकाम व्यावसायिक व सोशल मीडिया स्टार सुरेंद्र पाटील विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी त्यावेळी सांगितलं होतं की, आरोपी एका गुन्ह्यातील आणि महाराष्ट्र नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामधील फिर्यादी आहे. त्याच गुन्ह्यातील तपासात 19 लाख 96 हजारांची रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार परत करण्याचे आदेश दिले होते. ते देण्यासाठी 25 ऑक्टोबरला चौधरी हे मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्याच्या कक्षात कोणीही नसल्याने त्याचा फायदा घेत सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी याने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून खुर्चीच्या मागे असलेल्या महाराष्ट्र पोलिसांचा लोगो होता. त्याने तो व्हिडिओ प्रसारित केला. तर त्याच्या इतर व्हिडिओमध्ये तो हातात बंदूक घेऊन नाचताना दिसतो. गाडीवर देखील पोलिसांचा लोगो आहे.
मानपाडा पोलिसांनी 834 /2022 आणि 4,25 कलम सह 37 (3)135 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून त्याची असलेली मर्सिडीज कार आणि त्या गाडीमध्ये असणारे हत्यार असे एकूण 65 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर इतर पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या सुरेंद्रला आज तडीपार करण्यात आलं आहे.