मानवाड ग्रामपंचायत बिनविरोध होणार; ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

पन्हाळा तालुक्यातील मानवाड ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री गटासाठी राखीव आहे. गावात तंटा होवु नये, शांतता नांदावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

    कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील मानवाड ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री गटासाठी राखीव आहे. गावात तंटा होवु नये, शांतता नांदावी, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

    पन्हाळा पश्चिम भागातील जांभळी खोऱ्यातील आढाववाडी, सपकाळवाडी गुरववाडी, धनगरवाडा व बौद्धवाडी अशी मानवाड ग्रुप ग्रामपंचायत आहे. आमदार विनय कोरे यांचे समर्थक विद्यमान सरपंच फुलाजी पाटील यांच्या गटाविरोधात माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे संमर्थक कै. पांडुरंग खापणे, पका दाभोळकर, यशवंत खापणे, गंगाराम खापणे, विलास खापणे यांच्या गटात मागील पंचवार्षिक निवडणुकीत दुरंगी लढत झाली. यामध्ये कोरे गटाने बाजी मारली आहे. फुलाजी पाटील यांनी सरपंच पदाच्या लढतीत थेट सरपंच पदाची लढाई जिंकली. सदस्यपदांमध्ये बहुमत मिळवले, निवडणूक दरम्यान गावात शांतता बिघडली. त्यामुळे जनतेतून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते.

    विद्यमान सरपंच फुलाजी पाटील यांनी आपल्या सहकारी तसेच विरोधी गटातील काही नेत्यांची चर्चा करून बिनविरोध साठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री काळमादेवीच्या आवारात नुकतीच बैठक घेतली. सर्वांनी आपापल्या प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून देण्याबरोबरच सरपंच पद अडीच -अडीच वर्ष दोन्ही गटांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    सरपंच पद अथवा सदस्य किंवा ग्रामपंचायतच्या सत्तेला कोणत्याही पक्षाचे अथवा गटाचे नाव न देता सर्व सत्ता ही सर्व समावेशक सर्व जनतेची आहे. असे समजून गावचा कारभार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीस विद्यमान सरपंच फुलाजी पाटील, माजी सरपंच राऊ पाटील, प्रकाश दाभोळकर, नाथा खापणे, रघुनाथ देसाई, विश्वास पाटील, संदीप गुरव आदी नागरिक उपस्थित होते.