देहूनगरी भक्तिरसात चिंब; तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

महिनाभर वैष्णवांच्या या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तीमय, आनंदीमय अशा वातावरणात आज दुपारी तीन वाजता श्री संत तुकाराम महाराज (Shree Sant Tukaram Maharaj) आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान (Ashadhi Wari 2022) सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

    देहूरोड : ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा जयघोष आणि टाळ मृदंग पखवाजाचा गगनभेदी गजर याचा जोडीला सुरात सूर मिळवणाऱ्या पावसाच्या सरी, भक्तीरस आणि पावसाच्या सरीत ओलेचिंब होऊन व सर्व देहभान विसरून वारकरी संप्रदायाच्या ठेक्यावर नाचणारे वारकरी भाविक भक्त अशा मोठ्या भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पादुका, फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान झाल्या. महिनाभर वैष्णवांच्या या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तीमय, आनंदीमय अशा वातावरणात आज दुपारी तीन वाजता श्री संत तुकाराम महाराज (Shree Sant Tukaram Maharaj) आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान (Ashadhi Wari 2022) सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

    संत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता.२०) पहाटे ५ वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई यांची महापूजा पहाटे ६ वाजता वैकुंठस्थान येथे संत तुकाराम पूजा तर सकाळी ७ वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी येथे संस्थानचे अध्यक्ष, नितीन महाराज मोरे, पालखी प्रमुख संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे तसेच संत तुकोबांचे वंशज आणि वारकरी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

    सकाळी १० ते १ या वेळेत रामदास महाराज मोरे देहूकर, यांचे पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त भजनी मंडपात काल्याचे कीर्तन संपन्न झाले. सकाळी ९ ते ११ इनामदार साहेब वाड्यात संत तुकाराम महाराजांचे पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार हभप प्रकाश भगवानराव सोळुंकी मसलेकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्या डोईवर घेऊन मुख्य मंदिरात आणल्या.

    पादुकांची पूजा 

    देहू देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, रोहित पवार तसेच मनाचे वारकरी गोविंद गवलवाड महाराज नांदेडकर यांच्या हस्ते पुण्याचे पुरोहित पंडित प्रसाद जोशी यांच्या पौरहित्य आणि मंत्र पठणाने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना महाभिषक आणि पूजा करण्यात आली.

    यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तहसीलदार गीता गायकवाड, देहूच्या उपनगराध्यक्षा, नगरसेवक आदी उपस्थित होते. पूजा करून त्या पादुका विविध रंगी हार-फुला, पानांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर हरी नामाच्या गजरात दुपारी तीन वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान केले.

    पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्या

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. या ३२९ दिंड्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या महिला भक्तांच्या देखील दिंड्या आहेत. त्यात नवीन दिंड्या घेणे सध्या बंद आहे. परंतु अनेक दिंड्या नवीन असून, त्या पालखी सोहळ्यात सगळ्यात शेवटी असतात. यंदा ही वारी, हरित वारी असणार आहे, असे पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे यांनी सांगितले.