आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक; मंत्री सुरेश खाडे यांचा अडवला ताफा

मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे मराठा आंदोलकांनी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे यावेळी आंदोलकांनी घोषीत केले.

    सांगली : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याचे पडसाद आज सांगली जिल्ह्यातील मिरजेत उमटले. मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे मराठा आंदोलकांनी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे यावेळी आंदोलकांनी घोषीत केले.

    मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने आंदोलन तीव्र केले आहे. मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर त्यांनी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. तर राज्यातील शेकडो गावांमध्ये सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे लोण आता सांगली जिल्ह्यातही पसरू लागले आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवण्यात आला. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. खाडे यांना आरक्षणाबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी याबाबत विधीमंडळात आवाज उठवला नसल्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला. खाडे यांना शनिवारचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यास आंदोलकांनी सांगितले. त्याशिवाय आरक्षणाचा शासनाकडून अध्यादेश निघत नाही तोपर्यंत खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी जाहीर केले. येथून पुढे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी सांगितले.

    यावेळी विलासराव देसाई, संतोष माने, विजय धुमाळ, तानाजी भोसले, राजू चव्हाण, विक्रम पाटील, प्रशांत चव्हाण, अक्षय मिसाळ यांच्यासह मिरज शहरासह जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अचानक अडवल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.