
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा समाजातील अज्ञात तरुणांनी कुरुंदवाड-पुणे जाणारी एसटी बस शिरोळ येथील दत्त कारखाना गेट समोर फोडली.
शिरोळ : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा समाजातील अज्ञात तरुणांनी कुरुंदवाड-पुणे जाणारी एसटी बस शिरोळ येथील दत्त कारखाना गेट समोर फोडली. सुदैवाने प्रवाशी जखमी झाले नाहीत, या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाड येथून पुण्याला जाणारी एसटी बस शिरोळ येथील दत्त कारखाना गेट समोर आली असता अज्ञात तरुणांनी एसटीवर दगडफेक करत एसटीच्या समोरील व मागील बाजूच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या झालेल्या हल्ल्यात प्रवाशी जखमी झाले नाहीत. मात्र, एसटी बसचे सुमारे ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाले आहे.
याबाबतची फिर्याद एसटी चालक कैलास डांबरे यांनी शिरोळ पोलिसात दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे सांगत संतप्त तरुणांनी हिंसक पवित्रा घेतला. शिरोळ येथे एसटी बस फोडण्याचा प्रकाराने आंदोलन चिघळण्यास सुरुवात झाली आहे.