
सकल मराठा समाजाने ७० टक्के लढाई जिंकलेलीच आहे, मात्र गाफील राहू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, मात्र ते मिळू नये यासाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय षडयंत्र रचले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये १९६३ पूर्वीचे कुणबी दाखले सापडण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे मराठ्यांना आरक्षण होते हे सिद्ध झालेले आहे. ते आरक्षण मिळून न देणाऱ्या राजकीय नेतृत्वाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यायचाचं आहे. सकल मराठा समाजाने ७० टक्के लढाई जिंकलेलीच आहे, मात्र गाफील राहू नका संयमाने घ्या ज्यांचे दाखले मिळाले आणि ज्यांचे दाखले मिळाले नाही अशांमध्ये भांडण लावण्याचे उद्योग सुरू आहेत, त्यामुळे मराठा समाजाने एकी दाखवून आरक्षण मिळवा आणि पुढच्या पिढ्यांचे कल्याण करा, मात्र संयमाने परिस्थिती हाताळा, असे कळकळीचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सातारामध्ये केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने येथील गांधी मैदानावर अवघ्या दोन दिवसाच्या मुदतीत अत्यंत चोख तयारीनिशी आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आशीर्वाद सभेमध्ये तब्बल तीन तास उशिरा आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकी ठेवण्याचे केलेले आवाहन आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा घेतलेला परखड समाचार हे सभेचे वैशिष्ट्य ठरले. जनतेचा पैसा खाणारा हा जेलमध्ये जाणारच मी काही गोष्टी संयमाने घेतो आहे, बेताल वक्तव्य करणारी राजकीय दंगली घडवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या टप्प्यात आले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारच अशी कडवट टीका जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता केली.
मी समाजाशी गद्दारी करणार नाही
जरांगे पाटील पुढे म्हणाले, मुळात आरक्षण आपण समजून घेतलं नाही माझ्या उपोषणाच्या दणक्यामुळे न्यायमूर्ती शिंदे समिती संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असून, आत्तापर्यंत राज्यात पावणेपाच लाख कुणबी दाखले आढळलेले आहेत. सातारा जिल्ह्यातही २० हजाराहून अधिक नोंदी आढळून आले आहेत, म्हणजे मराठा समाजाला आरक्षण होतं मात्र सत्ताधाऱ्यांनी ते आपल्याला मिळू दिले नाही, आरक्षण नसल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. आपण केवळ अश्रू गाळण्या पलीकडे काहीच करत नव्हतो. मराठा समाजाने जागृत होऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा तेचं काम मी प्रामाणिकपणे करत आहे, आता यापुढे ७० वर्षाचा अनुशेष सरकार कसा भरून काढणार हा सुद्धा जाब मी विचारत आहे. २४ डिसेंबर पर्यंत सकल मराठा समाजाची कसोटी आहे, त्यामुळे गाफील राहू नका अन्यथा पुढच्या पिढीचे नुकसान होईल मराठा व कुणबी हे एकच आहेत हा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. सुरुवातीला हा अहवाल मराठवाड्यापुरता स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखवली मात्र हा प्रकार म्हणजे भावंडा भावंडांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे समितीला राज्यस्तरीय दर्जा देऊन सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी आग्रही आहे. मी माझ्या मायबाप समाजाशी गद्दारी करणार नाही प्राण गेले तरी आरक्षणाच्या मागणीसाठी मागे हटणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही जरांगे पाटील यांनी दिली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, काही राजकीय मंडळी आंदोलनाच्या आरक्षणांमध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचली जात आहेत. माझे आंदोलन दडपण्याचा राजकीयदृष्ट्या वारंवार प्रयत्न झाला पण मी सुद्धा बारीक दिसत असलो तरी माझी बुद्धी आरक्षणाच्या ध्येयापासून ढळलेली नाही. मराठा समाजाच्या मदतीला कोणतेही राजकीय नेतृत्व येणार नाही आपली लढाई आपल्याला लढायला हवी. २४ डिसेंबर नंतर आरक्षण मिळाले नाही तर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसून राज्य शासनाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे.