आरोग्य मंत्र्यांविरोधात मराठा क्रांती मोर्चा संतप्त; समाजाची माफी मागा

तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का, असा प्रश्न करीत तुम्हाला समाजाच्या भूमिकेसोबत उघड येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका.

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य करणारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तर, आपल्या वक्तव्यावर माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) केली आहे.

    मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का, असा प्रश्न करीत तुम्हाला समाजाच्या भूमिकेसोबत उघड येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाजविरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, असे केदार म्हणाले.

    मराठ्यांना ओबीसीमधूनच (OBC) आरक्षण ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली, असे बिनबुडाचे आरोप करू नये. तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, असा संतापही मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे.