
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. यावेळी शहरातून मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत विविध कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची नसल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बारामती: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती शहरामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. यावेळी शहरातून मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत विविध कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची नसल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी काही वक्त्यांनी यावेळी केली.
बारामती शहरातील कसबा येथील शिवाजी उद्यान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. बारामती शहरातील गुणवडी चौक, मारवाड पेठ, गांधी चौक, सिनेमा रोड, सुभाष चौक या ठिकाणाहून मोर्चा भिगवन चौकात आल्यानंतर हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. एक मराठा! लाख मराठा!!, आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!! छत्रपती शिवाजी महाराज की जय!, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडावी, अशी मागणी केली. भिगवन चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर, यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये जालना येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. जो आरक्षण देईल, त्याच पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. अनेक वर्षे सत्तेत असूनही मराठा आमदार व खासदारांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही ही मोठी दुर्दैवाची बाब असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये संपूर्ण समाजाने बहिष्कार टाकावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्यात मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार असूनही, समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संपूर्ण मराठा समाज आता एक झाला आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, चीन सारखे देश भारतात घुसखोरी करतात, तरी देखील शासन शांत बसत आहे, मात्र शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर अमानुषपणे लाठी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले, लाटठी हल्ल्याचा आदेश वरिष्ठांनीच दिलेला आहे, लाठी हल्ला करत असताना पायावर अथवा हातावर मारले जाते, मात्र आंदोलकांच्या डोक्यावरही मारहाण केली आहे, त्यामुळे या सरकारचा मराठा समाज निषेध करत असल्याचे अनेक वक्त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षण वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदारी यावेळी म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी संविधानिक अडचण आहे, परंतु ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश करून ओबीसी आरक्षण लागू करण्याची गरज आहे. यासंदर्भात ओबीसी नेते विरोध होते, ते ओबीसी नेते आत्ता आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची. मागणी करत आहेत. वास्तविक पाहता ओबीसींच्या लोकसंख्येच्या तुलनेत दिले जाणाऱ्या आरक्षण पाहता ओबीसींची लोकसंख्या त्या प्रमाणात नाही. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा. यासंदर्भात आपण छगन भुजबळ यांची देखील अनेक वेळा भेट घेतली आहे. दरम्यान यावेळी अनेक महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत मराठा समाजाला शासनाने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी केली. या सभेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे विविध मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले.
दरम्यान बारामती शहरातील वैद्यकीय दवाखाने, मेडिकल दुकाने सोडून अन्य सर्व व्यवसाय दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. भाजीपाला मार्केट देखील बंद होते. घरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता.
अजितदादा सत्तेतून बाहेर पडा
मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने बारामती शहरातून मोर्चा काढण्यात आल्यानंतर यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये बाहेर पडा, बाहेर पडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा! अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यानंतर झालेल्या जाहीर सभेतही अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे मत व्यक्त केले.