जरांगे पाटील यांनी दिले राणेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांचा पाणउतारा करेन…’

राणेंवर जरांगे पाटील यांनी निशाणा साधला असून इशारा दिला आहे. ते जर असं काही बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही. असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मागील सात दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली होती. यावरुन भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सडकून प्रतिक्रिया दिली होती. यानंतर आता राणेंवर जरांगे पाटील यांनी निशाणा साधला असून इशारा दिला आहे. ते जर असं काही बरळत असतील तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही. असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “माझा नारायण राणे यांना प्रश्न आहे की, तुम्ही तर पूर्वी मराठा-मराठा करून छाती बडवत होता. मग आता तुम्हाला काय झालंय. मी मराठ्यांसाठी बोलतोय. त्यामुळे तुम्ही माझ्या बाजून कधी काही बोललो बोलायला हवं होतं. तसेच मी तुम्हाला नाही, तुमच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. मग तुम्ही कोणाची री ओढताय? मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे. तसाच मला मराठ्यांचा अभिमान आहे. उगाच काहीही बोलायला तुम्ही एकटेच तीनसिंगराव लागून गेलात का?” अशा गावरान बोलीमध्ये जरांगे पाटील यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले.

    पुढे जरांगे पाटील म्हणाले, “मला काही मर्यादा असल्याने मी शांत आहे. त्यामुळे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे. तसेच माझी निलेश राणे यांना विनंती आहे की, नारायण राणे यांना समजावा. कारण पुढच्या वेळी मी त्यांना सोडत नसतो. माझ्यापुढे कोण आहे हे मी बघणारच नाही. कोण आहे, काय आहे, किती मोठा माणूस आहे असलं काही मी बघणार नाही. मी नारायण राणेंचा, त्यांच्या वयाचा आदर करतो. ते मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला आमच्याकडून डाग लागणार नाही, याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही आमची भावना समजून घ्या, अन्यथा मी त्यांचा पाणउतारा करेन. त्यांना खेटायचंच असेल तर माझीही तयारी आहे.” असा घणाघात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

    काय म्हणाले होते नारायण राणे ?

    मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात  फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !