maratha-reservation

मराठा आरक्षण हा विषय जातीय सलोख्याने हाताळावा, सामाजिक वातावरण खराब होऊ नये यासाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत मराठा समाजाचे ओबीसीकरण नको अशी भूमिका ओबीसी समाज विचारवंतांच्या बैठकीत घेण्यात आली.

    छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील काही वर्षापासून मराठा आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. यावर राज्यभरातून अनेक मोर्चे निघाले. मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नाही. दरम्यान, मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीतून (obc) आरक्षण देऊ नका, अशी मागणी ओबीसी समाज विचारवंतांच्या काल झालेल्या बैठकीत (meeting) करण्यात आली. मराठा आणि ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच यावर लवकर तोडगा काढून, मराठा समाजाला न्याय द्यावा असंही म्हणण्यात आलंय.

    ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का?

    शासन स्तरावरही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का देण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा आणि ओबीसी संघर्ष टाळायचे असेल, तर सरकारने वेळीच लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षणासाठी पाठिंबा दिला होता. मात्र, आता मराठा समाजातील काही नेते ओबीसी आरक्षणातून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत. ओबीसी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांसंदर्भात पुढील भूमिका ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    बैठकीत काय ठरले

    दोन सत्रात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी प्रा. प्रल्हाद लुलेकर, प्रा. श्रावण देवरे होते. यावेळी कल्याण दळे, डॉ. राजेंद्र कुंभार, राजीव हाके, प्रा. प्रभाकर गायकवाड, डॉ. साहेबराव पोपळघट, प्रा. वसंत हारकळ, डॉ. संजय मून, स. सो. खंडाळकर, लक्ष्मण वडले, शंकरराव लिंगे, दीपांकर शेंडे, सुभाष दगडे, विष्णू वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगरमधील श्री. संत सेना भवन येथे झालेल्या या बैठकीला ओबीसी समाजातील विचारवंतांची उपस्थिती होती. मराठा आरक्षण हा विषय जातीय सलोख्याने हाताळावा, सामाजिक वातावरण खराब होऊ नये यासाठी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत मराठा समाजाचे ओबीसीकरण नको अशी भूमिका ओबीसी समाज विचारवंतांच्या बैठकीत घेण्यात आली.