
बारामतीकरांनी अजित पवारांना बारामती तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. आज अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी कारखान्याच्या मोळी पूजनाला जाणार होते. परंतु मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे पवार यांनी दौरा रद्द केला आहे.
बारामती : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली होती. त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटलं आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढार्यांसाठी अनेक गावकऱ्यांनी गाव बंदी केली आहे.
याच पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी देखील अजित पवारांना बारामती तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीत जाणार होते. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने दौऱ्यासाठी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शिवाय आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यामुळे त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आली आहे.