
रविवारी वाटंगी येथे होणाऱ्या जलजीवन मिशन योजना अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्यापासून स्थानिक खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांना ग्रामस्थांनी रोखले.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आजरा तालुक्यातील ग्रामीण भागावतही उमटू लागले आहेत. रविवारी वाटंगी येथे होणाऱ्या जलजीवन मिशन योजना अंतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्यापासून स्थानिक खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांना ग्रामस्थांनी रोखले. अखेर या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत खासदार मंडलिक व आमदार राजेश पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन न करण्याचा निर्णय घेत आरक्षणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी खासदार व आमदारांच्या वाहनाखाली जाण्याचा प्रयत्न मराठा कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले.
वाटंगी येथे रविवारी जलजीवन मिशनचे पाणी योजनेचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारीही करण्यात आली होती. परंतु मराठा समाजाने आक्रमक होत संघटितरित्या या उद्घाटन सोहळ्यास विरोध करण्याचे ठरविले. सकाळपासूनच वाटंगी येथील बस स्थानक परिसर व गावांमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातामध्ये काळे झेंडे घेऊन आरक्षण मिळेपर्यंत सर्व नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशी भूमिका घेत निषेधाच्या घोषणा दिल्या.
कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण हे उद्घाटन करत नसल्याचे यावेळी मंडलिक व पाटील यांनी जाहीर केले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारमध्ये आवश्यक ते प्रयत्न करण्यास आपण बांधील आहोत. आपणही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत असेही दोघांनी स्पष्ट केले.
यावेळी मराठा बांधव यांच्यासह वाटंगीचे ज्येष्ठ नेते अल्बर्ट डिसोजा, एम.के. देसाई जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, अनिल फडके, संभाजी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाहनांखाली जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
दरम्यान खासदार मंडलिक व आमदार पाटील यांचे गावांमध्ये आगमन झाल्याबरोबर त्यांच्या वाहनाखाली जाण्याचा काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पोलीस निरीक्षक सुनील हरगुडे यांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हा प्रयत्न रोखला. ग्रामस्थांच्या वतीने विजय देसाई, सदानंद देसाई, संदीप देसाई यांनी मराठा समाज बांधवांच्या भावना मंडलिक व पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या. आमचा उद्घाटनाला विरोध नाही परंतु मराठा आरक्षणाची कागदपत्रे घेऊनच या आणि मग उद्घाटन करा उद्घाटन तुमच्याच हस्ते होईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. योजनेच्या उद्घाटनासाठी पाण्याचे कलश घेऊन स्थानिक महिला उपस्थित होत्या. परंतु उद्घाटन न झाल्याने पाण्याचे कलश तसेच घेऊन येथून महिला माघारी परतल्या.