वसई-विरार महापालिकेचा मराठा सर्वेक्षण घोटाळा समाजसेवकाने केला उघड

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मराठा सर्वेक्षणाचे काम पालिकेने पुर्ण केले होते.

    वसई : वसई-विरार महापालिकेत चालणारा अनागोंदी कारभार आणि घोटाळे उघड करणाऱ्या चरण भट या समाजसेवकाने आता मराठा सर्वेक्षण घोटाळा उघड केला आहे.

    राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठा सर्वेक्षण करण्याचे काम वसई-विरार महापालिकेने २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान हाती घेतले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मराठा सर्वेक्षणाचे काम पालिकेने पुर्ण केले होते. या कामासाठी मुलाखती घेताना महापालिकेने प्रत्येक स्वयंसेवक विद्यार्थ्यास शंभर घरांचे सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यास १० हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या अटीवर सर्व विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्मही भरून घेण्यात आला होता. मात्र आता सर्वेक्षण पूर्ण होऊन चार महीने उलटल्यानंतर महापालिकेने घूमजाव केले असून शंभर मराठा घरांचे सर्वेक्षण केल्यास महापालिका १० हजार रुपये मानधन देण्यास बांधील असल्याचा अंधाधुंदी निर्णय दिला आहे.

    आपल्या कॉलेज फी आणि पॉकेटमनीसाठी सर्वेक्षणाच्या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि स्वयंसेवकांची अशाप्रकारे पालिकेने आर्थिक फसवणूक केली आहे. महापालिकेने या गरजू विद्यार्थ्यांची दिशाभूल केली असून १०० मराठा घरांचे सर्वेक्षण केल्यानंतरच मानधन देण्यात येईल ही अट काम देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे होते. मात्र तसे न करता विद्यार्थ्यांची फसवणूक करून, त्यांच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारून यातून महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला असल्याची शक्यता समाजसेवक आणि पर्यावरणतज्ज्ञ चरण भट यांनी व्यक्त केली आहे.

    चार-पाच मजली इमारती लिफ्टशिवाय चढउतार करुन सर्वेक्षण करणाऱ्यांपैकी २० टक्क्याहून अधिक स्वयंसेवकांची नावे कापण्यात आली आहेत. याप्रकरणी स्वयंसेवकांनी पालिकेशी संपर्क साधला असता, ही नावे पुण्याहून कापण्यात आल्याचे थातूर मातूर उत्तर देऊन त्यांना टाळण्यात आले. तसेच निवडणूकीचे काम सुरु असून, तुम्ही मध्ये-मध्ये त्रास द्यायला येऊ नका असा सज्जड इशाराही त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, हा एक मोठा घोटाळा असून, या विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न ते करणार असल्याचे चरण भट यांनी स्पष्ट करुन दिलासा दिला आहे.