मराठी क्रांती मोर्चा आक्रमक! अजित पवार यांच्या उपस्थितीला विरोध; ‘माळेगांव’च्या गळीत हंगाम शुभारंभासाठी राजकीय नेत्यांना बंदी घालण्यासाठी निवेदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमास अजित पवार अथवा कोणत्याही व्यक्तीस निमंत्रित करू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

    बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या कार्यक्रमास अजित पवार अथवा कोणत्याही व्यक्तीस निमंत्रित करू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

    याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे.मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय व्यक्तींना महाराष्ट्रात गाव बंदी केलेली आहे. तशी प्रसिध्दी राज्यभर दिलेली आहे.त्यानंतर देखील कारखान्याचा गळीत हंगाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

    मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय व्यक्तींना गाव बंदी आहे. त्यामुळे या वर्षीचा गळीत हंगाम कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते करू नये,अशी विनंती अध्यक्ष केशवराव जगताप यांना करण्यात आली आहे.राजकीय व्यक्तींच्या हस्ते गळीत हंगाम सुरू करणेचा घाट घातल्यास कारखान्यावर बहुसंख्येने जमून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील,असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.