मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था मिळेल : खासदार शरद पवार 

मराठी संगीत रंगभूमीची चिंता वाटावी, अशी ज्या वेळी स्थिती होती त्या वेळी शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. आता युवा पिढी संगीत रंगभूमीकडे वळत आहे. हे पाहून गंधर्वकाळातील संगीत रंगभूमीची ऊर्जितावस्था पुन्हा पाहावयास मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

    पुणे : मराठी संगीत रंगभूमीची चिंता वाटावी, अशी ज्या वेळी स्थिती होती त्या वेळी शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. आता युवा पिढी संगीत रंगभूमीकडे वळत आहे. हे पाहून गंधर्वकाळातील संगीत रंगभूमीची ऊर्जितावस्था पुन्हा पाहावयास मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

    मराठी रंगभूमी पुणे या संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगता समारंभात सोमवारी ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय हरिभाऊ देशपांडे आणि युवा तबलावादक रोहन भडसावळे यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘शिलेदार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले, त्या वेळी पवार बोलत होते.

    या वेळी मराठी रंगभूमी पुणेच्या अध्यक्षा लता भोगले, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, उद्योजक सतीश भिडे, नाट्य व्यवस्थापक सत्यजित धांडेकर, समीर हंपी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर गोविंद बल्लाळ देवल लिखित ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाचा शरद पवार यांनी आनंद घेत सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

    पवार म्हणाले की, गंधर्वभूषण जयराम शिलेदार, जयमालाबाई आणि त्यांच्या कन्या लता तसेच कीर्ती यांनी आपल्या कलेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य केले. संगीत नाटकाची परंपरा जतन केली पाहिजे, वाढविली पाहिजे, या आस्थेतून शिलेदार कुटुंबीयांनी तीनदिवसीय नाट्य महोत्सव यशस्वी करून दाखविला. संगीत रंगभूमीसाठी एक नवीन पिढी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून शिलेदार कुटुंबीयांनी तळमळीने कष्ट केले. संगीत नाटकांचे अनेक प्रयोग केले. यातून नवीन पिढी तयार झाली. या सगळ्याचा परिणाम म्हणून संगीत रंगभूमीचे महाराष्ट्रात पुनरुज्जीवन होईल.  वर्षा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. वैभवी जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.