भगवान गडावरील दसरा मेळाव्याला औरंगाबादमधून 300 गाड्या, पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील सावरगाव (सुपे) येथे १५ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तिगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबाद शहरातून 300 गाड्यांतून समर्थक जाणार आहेत. सर्वांनी दसऱ्याच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता झाल्टा फाटा येथे जमावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी केले.

    औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील सावरगाव (सुपे) येथे १५ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तिगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबाद शहरातून 300 गाड्यांतून समर्थक जाणार आहेत. सर्वांनी दसऱ्याच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता झाल्टा फाटा येथे जमावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव प्रवीण घुगे यांनी केले होते. त्यानुसार सर्व कार्यकर्ते आज औरंगाबादेतून निघाले आहेत.

    दरम्यान या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बुधवारी सिडको कामगार चौकातील चाटे हाऊसमध्ये समर्थकांची बैठक झाली. या वेळी घुगे यांच्यासह प्रा. गोविंद केंद्रे, राजू सानप, दीपक ढाकणे, प्रा. आनंद वाघ, मनोज भारस्कार, श्रीनिवास दराडे, मनीषा मुंडे, सागर पाले, अनिल सोनवणे, प्रशांत दिघोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या वेळी घुगे यांनी औरंगाबाद शहरातून जवळपास 300 गाड्या निघणार असल्याचे सांगितले. या गाड्या सर्व समर्थकांच्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या गाडीत जेवढी जागा असेल, तेवढ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे. झाल्टा फाटा येथून सर्वांनी सोबतच निघायचे आहे. तेथून बीड, मांजरसुंबा येथे जायचे. तेथे खासदार प्रीतम मुंडे यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन घुगे यांनी केले. तसेचं सावरगाव घाट (जि. बीड) येथील भगवान भक्तिगड येथे होणाऱ्या मेळाव्यास पक्षीय मतभेद बाजूला सारून उपस्थित राहण्याचे आवाहन माधवबन ओबीसी भटके-विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे यांनी केले आहे.

    दसरा मेळावा भगवान गडावरील 12 एकर परिसरात

    मागील दोन वर्षांपासून सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होत होते. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. या वर्षी मात्र पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. आता पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील 12 एकर परिसरात पार पडत आहे. आज सकाळीच खासदार प्रीतम मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. आता पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.