९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ३ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन; जगभरातील ५५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून, ३ ते ७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

    छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून, ३ ते ७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

    नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे.

    एनएफडीसी व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत. नाथ स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अँण्ड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमिक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम ९०.८ हे रेडिओ पार्टनर आहेत.

    अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश

    आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपटजाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

    भारतीय सिनेमा स्पर्धा

    महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे.

    फ्रिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फ्रिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फ्रिप्रेसीने अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे.