शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप करणार 21 तारखेला औरंगाबादेत आक्रोश आंदोलन; पंकजा मुंडे सहभागी होणार का?

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई तात्काळ देण्याच्या मागणीसाठी, भाजप किसान मोर्चाच्या वतीने येत्या 21 तारखेला औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. औरंगाबाद मध्ये होणाऱ्या भाजपच्या या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सहभागी होणार का? हे पाहणे देखील आता महत्त्वाचा असणार आहे.

    औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई तात्काळ देण्याच्या मागणीसाठी, भाजप किसान मोर्चाच्या वतीने येत्या 21 तारखेला औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. याबाबतची माहिती भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

    या आक्रोश आंदोलनामध्ये बीड मधील भाजपा कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी होणार आहेत. आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली दहा हजार कोटींची मदत अतिशय तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकारने केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. दहा हजार कोटींचा आकडा मोठा असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी मात्र तुटपुंजी मदत मिळणार आहे. त्यामुळे पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना सरसकट 50 हजारांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.

    दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन झालं होतं. मात्र या आंदोलनामध्ये भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले नव्हते. यावेळी भाजप मधील अंतर्गत गटबाजी दिसून आली होती. त्यामुळेच औरंगाबाद मध्ये होणाऱ्या भाजपच्या या आंदोलनामध्ये पंकजा मुंडे सहभागी होणार का? हे पाहणे देखील आता महत्त्वाचा असणार आहे.