…तर आधार कार्ड, पॅन कार्ड आदी ओळखपत्र खिशात घेऊनच फिरा; जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  औरंगाबामध्ये देखील याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा आणि आवश्यक काम करणाऱ्या व्यक्तींनाच सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी  अनंत गव्हाणे आदींची उपस्थिती होती.

कोरोना व इतर युरोपीयन देशात आढळणारा नवीन विषाणूचा प्रसार जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेण्याच्या उद्देशाने सध्या औरंगाबाद शहरात रात्री अकरा ते सकाळी सहा वेळेत संचार बंदी लावण्यात येत आहे. तसेच कलम १४४ लागू करण्यात आल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी जमाव देखील करू नये. आताच या विषाणूबाबत खबरदारी, सतर्कता राखली तर विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचाही नागरिकांनी दैनंदिन जीवनात अवलंब करावा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

औरंगाबाद विमानतळावर योग्य ती खबरदारी घेऊन प्रवाशांची तपासणी करण्यात येते आहे. यापुढेही अधिक सतर्क राहून विमानतळावर तपासणी करण्यात येईल. सध्या मनपा हद्दीत असलेली संचारबंदी ग्रामीण भागाचा आढावा घेऊन त्याठिकाणच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर  नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हॉटेल्सदेखील रात्री 10.30 वाजेपर्यंत बंद राहतील, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

पोलिस आयुक्त श्री. गुप्ता यांनीही  या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणीसाठी जनतेनेही पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. केवळ पोलिसांवर संचारबंदीची अंमलबजावणीची जबाबदारी टाकून चालणार नाही, तर सुजाण नागरिकांप्रमाणे संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती नागरिकांना केली. त्याचबरोबर आवश्यक तेवढा बंदोबस्त संचारबंदीसाठी लावण्यात येईल, असेही श्री. गुप्ता यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक श्रीमती पाटील यांनीही संचारबंदी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

संचारबंदीत यांना सूट, पण ओळखपत्र आवश्यक

आरोग्य सेवा, औषधी दुकाने, औद्योगिक कारखाने, औद्योगिक कारखान्यातील कामगार, मालवाहतूक करणारे वाहने, मजूर, हमाल, अत्यावश्यक सेवा, पेट्रोल पंप, कॉल सेंटर, आवश्यक आस्थापनांवर रात्रीचे काम करणारे कर्मचारी, अधिकारी, दळणवळण, दूरसंचार, पाणीपुरवठा यंत्रणा, बस, खासगी बस आदींना संचारबंदीतून सूट असेल. तसेच संचारबंदी कालावधीत रात्री बाहेर पडणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी, आवश्यक आस्थापनांवरील अधिकारी, कर्मचारी, मजूर आदींना संचारबंदी काळात सूट देण्यात येते आहे. मात्र,  तरीही संबंधितांनी विहित ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे, अथवा शासनाचे अधिकृत केलेले वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी ओळखपत्र म्हणून सोबत बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.