पुढील चार-पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन औरंगाबाद महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

    औरंगाबाद :  हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन औरंगाबाद महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे.

    गेल्या आठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. खाम नदी आणि सुखना नदी काठच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सुखना नदीला आलेल्या पुरामुळे चिकलठाणा परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे इथल्या नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

    दरम्यान त्यातच आता पुन्हा विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासक पांडेय यांनी महानगर पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

    तसेच नागरिकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने देखील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, यंत्रणा सज्ज असल्याचे म्हटले आहे. मात्र, या पावसाने शेतीचे आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.