मुख्यमंत्र्यांचा मुक्तीसंग्राम? : ‘आता हात धरायची पंचाईत’ ते ‘आमचे भावी सहकारी’ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणाने चर्चांना उधाण

जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

  औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या Marathwada mukti sangram din निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेलं भाषण आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

  ‘आता हात धरायची पंचाईत’

  “आता जे चाललय त्याला क्लायमेट चेंज म्हणायचं. हे दुर्भाग्य आहे आपलं. तोंडाला पट्ट्या लावणं, एकमेकांत अंतर ठेवणं हे सर्व सुरु आहे. आपण नेहमी म्हणतो की आम्ही हातात हात घालून काम करु. आता हात धरायची सुध्दा पंचाईत आहे. आता हात धरले की लगेच हात धुवा, अंतर ठेवा, मास्क लावा हे सगळे दुष्परिणाम आहेत फटके आहेत.”

  ‘आमचे भावी सहकारी’

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.

  जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते.

  या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.