निर्यात वाढवणे म्हणजे सर्वात मोठी देशभक्ती- नितीन गडकरी

महात्मा गांधींच्या स्वदेशी व स्वालंबन या तत्त्वाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण भागाचा विकास होऊ शकेल. कृषी आणि ग्रामोद्योगाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे.

औरंगाबाद. निर्यात वाढवणे म्हणजे सर्वात मोठी देशभक्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महात्मा गांधींच्या स्वदेशी व स्वालंबन या तत्त्वाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ग्रामीण भागाचा विकास होऊ शकेल. कृषी आणि ग्रामोद्योगाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे गरजचे आहे.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘टेक्‍निकल एक्‍सलन्स सेंटर’चे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी यांनी अर्थव्यवस्था आणि संभाव्य संधींवर भाष्य केले. देशात गरिबी आणि भूकबळी या मुख्य समस्या आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्‍यक आहे. देशाची अर्थव्यवस्था चिंता करण्यासारखी आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा जीडीपीत टक्के वाटा आहे. हा वाटा ३० टक्‍क्‍यांपर्यंत नेऊन निर्यात ४० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ६० कोटी रोजगार तयार झाले आहेत.

स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात कोणते धोरण राबवता ते महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी द्रष्टे नेते होते. देशात अधिक उत्पादनाची गरज असल्याचे त्यांचे मत होते. स्वदेशी, स्वावलंबन या गांधी विचाराला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास देशाचे आर्थिक चित्र बदलेल, असे गडकरी म्हणाले.

स्वदेशी म्हणजे मागासलेपण नसून आधुनिक ते स्वीकारताना स्वदेशी नाकारणे योग्य ठरणार नाही. भारतात अगरबत्तीची काडीसुद्धा तैवान, इंडोनेशियातून आयात होते. हा चार हजार कोटींचा व्यापार होता. अधिकचा कर लावून ही आयात थांबवली. आता भारतातच काड्यांची निर्मिती होऊन २५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, अगरबत्तीच्या काड्यासाठी योग्य बांबू नसल्याने आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आयात थांबवून निर्यात वाढल्यास देशाच्या उत्पन्नात वाढ होईल, असे गडकरी म्हणाले.