विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नामकरणाचा शासन आदेश त्वरीत निर्गमित करा; आ.सतीश चव्हाण यांची कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

ज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे त्वरीत भरावीत अशी देखील मागणी सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्र्यांकडे केली. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषी विद्यापीठाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेऊन लवकरच पदभरतीची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले

    औरंगाबाद:  लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नामकरणाचा शासन आदेश त्वरीत निर्गमित करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.
    राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक यासह विविध क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा विचार करता लातूर येथील कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद तसेच राज्याच्या कृषी परिषदेने सन २०१३ मध्ये ठराव घेऊन त्यास मान्यता देखील दिली. कृषी परिषदेने सदरील प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे शिफारस केली आहे. परंतु हा प्रस्ताव ७-८ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असून यासंदर्भात अद्यापही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. सदरील महाविद्यालयाचे नामकरण विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय असे करण्यास मान्यता देऊन त्वरीत शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी देखील यासंदर्भात त्वरीत कार्यवाही केली जाईल असे आ.सतीश चव्हाण यांना सांगितले.
    राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे त्वरीत भरावीत अशी देखील मागणी सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्र्यांकडे केली. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषी विद्यापीठाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेऊन लवकरच पदभरतीची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले असल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले.