बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेना यश

बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल विजयी झाल्याचे समोर आले आहे. यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आठपैकी पाच जागेवर शेतकरी विकास पॅनलला विजय मिळाला आहे. हा पंकजा मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे.

    बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना धक्का बसला आहे. बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या अमोल आंधळे यांचा विजय झाला आहे. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकल्यानंतरचं स्पष्ट झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल विजयी झाल्याचे समोर आले आहे. यात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आठपैकी पाच जागेवर शेतकरी विकास पॅनलला विजय मिळाला आहे. हा पंकजा मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे.

    बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 20 मार्चला पार पडली. या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या आमोल आंधळे यांचा 223 मतांनी विजय झाला आहे. तसेच भाऊसाहेब नाटकर यांना 42 तर अपक्ष उमेदवार पापा मोदी यांना 92 मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या धनराज राजाभाऊ मुंडे यांना 9 मतं मिळाली आहेत. तसेच बदामराव पंडित यांना 2 मते मिळाली आहेत. या निवडणूकीत मंत्री धनंजय मुंडे यांना चांगले यश मिळाले आहे.

    पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

    दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.