बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची अभद्र युती; सातशे एकर देवस्थान जमिनीच्या परस्पर विक्रीचे रॅकेट

या प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून खाडे यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान या प्रकरणी आघाडी सरकारमधील महसूलमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाआघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यानी लक्ष घालावे अशी मागणी वारकरी संप्रदायाचे राम खाडे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.

  • वारकरी, सामाजिक कार्यकर्त्यांचे शरद पवारांना साकडे

मुंबई : बीड येथील सामाजिक कार्यकर्ता राम खाडे यांनी आणि बीड जिल्हातील वारकरी संप्रदायाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महसूल प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, आणि शिरूर तालुक्यातील सातशे एकर देवस्थान इनाम वर्ग दोनच्या जमिनी परस्पर विक्री केल्या जात असून यामागे स्थानिक माजी आमदार भीमराव धोंडे आणि भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू आहे.

सुनावणी प्रलंबित

या प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून खाडे यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान या प्रकरणी आघाडी सरकारमधील महसूलमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाआघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यानी लक्ष घालावे अशी मागणी वारकरी संप्रदायाचे राम खाडे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.

देवस्थान इनाम जमिनी विक्रीचे रॅकेट

शरद पवार आणि जिल्हा महसूल प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमिनीचे मोठे रॅकेट असून त्याचा मुख्य दलाल मनोज रत्नपारखे हा आहे. या रॅकेटमध्ये विठोबा देवस्थान खर्डा मुर्शदपूर, वाहिरा रूई येथील शेख महमद बाबा देवस्थान, श्रीराम देवस्थान कोयाळ आष्टी, खंडोबा देवस्थान आष्टी, विठोबा देव खडकत, हिंगणी दादेगाव येथील मसजीद व दरगाहची जमीन, लोणी येथील मारूती मंदीर, ढोर गल्लू तवलवाडी येथील मशीद इनाम जमीन अशा सुमारे तीन तालुक्यातील सातशे एकर इनाम वर्ग दोनच्या जमिनीच्या विक्रीचा घोटाळा केला जात आहे.

बडतर्फ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बनावट कागदपत्रे

यासाठी २०१७-१८ मध्ये बडतर्फ झालेले उपजिल्हाधिकारी एन आर  शेळके आणि महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा दावा खाडे यांनी तक्रारीत केला आहे. सुमारे पाचशे कोटी रूपये किमतीच्या इनाम वर्ग दोन देवस्थान जमिनीच्या विक्रीच्या या घोटाळ्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राम खाडे यांच्यावर ३१ऑगस्ट २० रोजी बीड येथे महसूल कार्यालयाबाहेर स्थानिक गुंडाकडून जीवघेणा हल्ला देखील करण्यात आल्याचे तसेच विनयभंग अॅट्रोसिटीचे खोटे गुन्हे देखील दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

वारकरी संप्रदायाचा जमिनी विक्रीला विरोध

तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा या देवस्थान जमिनी विकण्यास विरोध असून या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.